

जालना : मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि व्यासपीठ शुक्रवारील रात्रीतून हटवण्यात आले आहे. २९ ऑगस्ट २०२३ पासून म्हणजेच तब्बल ३ वर्षे २७ दिवस अखंड उभा असलेला हा मंडप ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर काढण्यात आला आहे.
गावात सतत होणाऱ्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे काही ग्रामस्थांचा या आंदोलनाला विरोध होता, त्या विरोधातून सामंजस्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आधीच जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर होत असलेले आरोप आणि त्यापाठोपाठ आता अंतरवालीत व्यासपीठ हलविण्याचा घडलेला प्रकार हा जरांगे यांना मोठा धक्का मानल्या जात आहे.
२९ ऑगस्ट २०२३ रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर हे ठिकाण मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले. आंदोलनाच्या विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या मंडपाबाबत ग्रामस्थांमध्ये विरोधाचा सूर ऐकावयला मिळत होता. सततच्या आंदोलनामुळे गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे.
बाजूलाच शाळा असल्याने मुलांच्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होत आहे, असे काही गावकऱ्यांचे म्हणणे होते. त्यातून हे आंदोलन आता दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणीही काही गावकऱ्यांनी केली होती. अखेर ग्रामस्थ, सरपंच आणि मनोज जरांगे पाटील यांच्या स्थानिक कोअर कमिटीमध्ये झालेल्या संवादानंतर शुक्रवारी रात्रीच मंडप आणि व्यासपीठ हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी ग्रामसभा वादळी होण्याची चिन्ह
अंतरवालीत शुक्रवारी स्थगित झालेली ग्रामसभा आता सोमवारी होणार आहे. ही सभा वादळी ठरण्याची चिन्ह आहे. कारण काही ग्रामस्थांची या पुढे गावात कोणतेही आंदोलन नको, अशी मागणी असून तसा ठराव ते ग्रामसभेसमोर मांडणार असल्याचे सांगण्यात आले.
‘अंतरवालीत हे शेवटचे आंदोलन होते’ : जरांगे
मंडप हटवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या आंदोलनात अंतरवाली येथील शेवटचं आंदोलन असा शब्द वापरला आहे. अंतरवाली येथील व्यासपीठ आणि सर्व साहित्य आता काढले आहे. आता सरकारने केले नाही तर इथून पुढे पाटोदापासून पुढे आंदोलन होईल. ग्रामसभेत या मंडपाला विरोध असल्याचे सांगितल्या जाते, याबाबत खुलासा करताना जरांगे म्हणाले, ग्रामसभा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही.
यापूर्वीही ग्रामस्थांकडून आंदोलनाबाबत विरोध झाला होता आणि ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. मात्र त्यावेळीही आपण आंदोलन थांबवले नसल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे आंदोलन येवला आणि परळी गावातील कुठल्याही गावात होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होऊ शकते. मी थांबलो नाही, आंदोलन सुरू आहे. यापुढे अंतरवाली येथे आंदोलन होणार नाही. आपल्या आंदोलनासाठी गावकऱ्यांनी रक्त सांडले, सर्वच गावकऱ्यांनी खूप मदत केली. अंतरवाली आणि मराठा समाज हे एक समीकरण आहे, मी गावकऱ्यांचा आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल खूप अभारी आहे, असेही ते म्हणाले.