

अंबड : अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या गोंदी पोलिसांच्या पथकाच्या अंगावर वाळूने भरलेला हायवा घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना डोणगाव शिवारात रविवारी (दि. ८) मध्यरात्री घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने अनर्थ टळला. मात्र, हायवाने शासकीय मोटारसायकलला धडक दिल्याने तिचे नुकसान झाले. यावेळी पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदी पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चैनसिंग पुरुषोत्तम नागलोत हे पोलीस हेडकॉन्स्टेबल साठे यांच्यासह शनिवारी रात्री रात्रगस्तीवर होते. डोणगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी काळे व कणसे यांना मदतीसाठी बोलावण्यात आले.
रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास डोणगाव गावातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने वाळू घेऊन जाणारा एमएच-२१-सीसी-२३६० क्रमांकाचा हायवा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी हायवा थांबवून वाळू वाहतुकीच्या रॉयल्टीची विचारणा केली असता चालकाकडे रॉयल्टी नसल्याचे समोर आले.
हा हायवा पंकज अप्पा सोळुंके यांचा असल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी हायवा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले असता चालकाने नकार दिला.यानंतर चालकाने मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर दोन चारचाकी वाहनांतून पंकज सखाराम सोळुंके, अरबाज अकबर पठाण, नरेश दहिंडडे तसेच अन्य व्यक्ती घटनास्थळी आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पंकज सोळुंके याने हायवा चालकाला पोलिसांच्या दिशेने वाहन नेण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर हायवा पोलिसांच्या दिशेने नेण्यात आला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी बाजूला होत स्वतःचा बचाव केला. मात्र, हायवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-२१-बीएस-६७१५ क्रमांकाच्या शासकीय मोटारसायकलवर जाऊन आदळला.
यात मोटारसायकलचे नुकसान झाले. त्यानंतर चालक हायवा घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पसार झाला. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), १३२, ३०३(२), ३५२, ३२४(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज सखाराम सोळुंके, अरबाज अकबर पठाण, नरेश दहिंडडे, हायवा चालक आणि अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण राजेंद्र हावळे करीत आहेत.
वाळू तस्करांकडून वाढते हल्ले चिंताजनक
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या पथकांनाच विरोध करण्याचे प्रकार अंबड तालुक्यात सातत्याने समोर येत आहेत. कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी हुज्जत, शिवीगाळ तसेच हल्ल्याच्या घटना घडत असल्याने अवैध वाळू वाहतुकीला आळा घालताना प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डोणगाव येथील घटनेमुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.