

जालना ः घनसावंगीकडून अंबडकडे येणारा 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा 6 किलो गांजा तसेच 1 लाख 20 हजारांच्या दोन दुचाकी असा 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल अंबड पोलिसांसह स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडला.
घनसावंगीकडून अंबडकडे दुचाकीवर मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजा अवैधरीत्या नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंबड पोलिस ठाण्याच्या मदतीने स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी घनसावंगी फाटा येथे सापळा रचून गांजा ताब्यात बाळगणारे संशयित सुरज गोविंद काळबंडे( रा. मच्छिंद्रनाथ चिंचोली, ता. घनसावगी), सचिन किसन नन्नवरे ( रा.छत्रपती शिवाजीनगर, घनसावंगी, ता. घनसावंगी), संतोष सुंदर मुंढे (रा.माव पाटोदा, ता. परतूर), महेश देवराव चव्हाण (रा. छत्रपती शिवाजीनगर, घनसावंगी) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा 6 किलो गांजा मिळून आला.
यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या 1 लाख 20 हजारांच्या दोन मोटार व 1 लाख 20 हजारांचा गांजा असा 2 लाख 40 हजारांचा मद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सी.व्ही.ठुबे, अंमलदार यशवंत मुंढे, संजय क्षीरसागर, अरुण मुंढे, तुकाराम मदन, अशोक मस्के, धनाजी गवळे, दीपक सोनवणे, विनोद भानुसे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली.
जालना जिल्ह्यात गांजाची दुचाकीवर राजरोश वाहतूक करण्यात येत असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांनी चांगलेच डोकेवर काढल्याची चर्चा जोर पकडताना दिसत आहे.