

After hitting the divider, the car caught fire
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वराचे श्रवणानिमित्त दर्शन घेऊन सोलापूरकडे मध्यरात्री परतणाऱ्या शिक्षकांची कार दुभाजकाला धडकल्याने कारने थेट पेट घेतला. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात फौजी हॉटेल समोर झाला. कार मधील सुरेश उटगीकर, सागर रामपुरे, तुकाराम मुचंडे, विठ्ठल शिवशेठी, बाबू पवार (सर्व रा.सोलापूर) हे अपघातात जखमी झाले आहेत.
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सोलापूर येथून सुरेश उटगीकर, सागर रामपुरे, तुकाराम मुचंडे, विठ्ठल शिवशेठी, बाबू पवार हे पाच शिक्षक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.
रात्री बारा वाजता हे सर्व शिक्षक भाविक घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन टाटा पंच कार (क्रमांक एम एच १३ ई के ५८७०) ने सोलापूरकडे परतत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारातील हॉटेल फौजी समोर कार चालकांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गावरील दुभाजकाला धडकली. त्यानंतर कारने काही क्षणांमध्येच मोठा पेट घेतला. अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन कार मधील जखमींना तातडीने कार बाहेर घेऊन या घटनेची माहिती भोकरवाडी येथील टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला दिली.
रुग्णवाहिकेवरील कर्मचारी महेश जाधव, आत्माराम गाढे, रवी गाढे यांनी घटनास्थळी दाखल होऊन सर्व जखमींना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घाटी रुग्णालयात उपचार
वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करीत आहेत.