

16 percent increase in usable water reserves in the district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठड्यात पावसाने कमबॅक करत जोरदार बॅटींग केली. यामुळे पाण्याची मोठी आवक झाली. त्यापोटी मागच्या आठवड्यात असलेला १२ टक्के पाणी साठा हा सुमारे १६ टक्क्याने वाढला. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७ लघू मध्यम प्रकल्पात २८.४८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५४ लघू प्रकल्प आहे. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी २३४.८८ दलघमी इतकी आहे. सध्या १ ऑगस्ट पर्यंत कल्याण मध्यम प्रकल्प, कल्याण गिरीजा, अप्पर दुधना, जुई मध्यम प्रकल्प, धामणा, जुई आणि गलाटी या सात मध्यम प्रकल्पात १६.१८ दलघमी साठा उपलब्ध आहे.
तर मागच्या आठवड्यात हा साठा ११.५३ टक्के इतका होता. आजपर्यंत ५७ लघु प्रकल्पात ३७.८८ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सात मध्यम प्रकल्पापैकी जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. तर ५७ पैकी १७लघु प्रकल्प जोत्याखाली गेल्या आहेत.
तर जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा येथील लघू पाझर तलावाला अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. जुलैच्या महिलन्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा लघु प्रकल्पाची पाणी पातळी ही ५१ ते ७५ टक्क्यापर्यंत आली आहे. तर दोन मध्यम आणि ९ लघु प्रकल्पाची पातळी ही २५ ते ५० टक्क्यापर्यंत आली आहे. ० ते २५ पर्यंत पाणी पातळी असलेले मध्यम प्रकल्प ४ असून लघु प्रकल्प १५ इतके आहेत. सध्या जिल्हाभरातील मध्यम प्रकल्पापैकी १ प्रकल्प ज्योत्याखखील असून सुमारे १७ लघू प्रकल्पाची पाणी पातळी ज्योत्याखाली आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असून, अद्यापी पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. परंतु, या महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाउस कार्यान्वित होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.