

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील मंगळ बाजार भागात बांधकाम परवानगीपेक्षा अधिकच्या जागेवर बांधकाम केल्याच्या आर-ोपावरुन महापालीकेचे अनधिकृत बांधकाम निरीक्षक भाऊलाल राठोड यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलिस ठाण्यात जागा मालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण मोहीम असतानाच दुसरीकडे शहरातील रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. विकास आर ाखड्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाच, दहा, बारा मीटरपर्यंतची अनेक बांधकामे निष्कासित केली जात आहेत. शहरातील काही प्रतिष्ठित व्यापारी रीतसर बांधकाम परवानगी घेऊनही परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करून रस्ते लहान करत असल्याचे चित्र सध्या जालना शहरात दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर, जालना शहरात अनधिकृत बांधकांवर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शहरातील मंगळ बाजार भागात बांधकाम परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांनी बांधकामस्थळी जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला.
या तपासणी अहवालावरून वंदना जगदीश प्रिथ्यानी, जगदीश केवलराम प्रिथ्यानी, अनिकेत जगदीश प्रिथ्यानी यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम निरीक्षक भाऊलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शाकील हुसेन शेख (रा. गांधीनगर, जालना) यांनी २४ मार्च २०२५ रोजी महानगरपालिका कार्यालयात याबाबत निवेदनाद्वारे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळपाहणी निरीक्षक अशोक के. लोंढे यांनी केली होती. या अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी अहवालानुसार, त्यांनी अतिरिक्त जा-गेतही बांधकाम केले आहे व त्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भाऊलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुद्दा ऐरणीवर
या घटनेमुळे जालन्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि यावर पोलिस तसेच प्रशासनाकडून पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.