

Action taken if vehicles are parked on the road
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा: बदनापूर शहरातून जाणाऱ्या जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिला आहे.
बदनापूर शहरातील जालना छञपती संभाजीनगर मार्गावर मोठ्या संख्येने खाजगी वाहन चालक वाहने उभी करीत असल्याने महामार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांमुळे छोटेमोठे अपघातही होत आहेत. जालना-छत्रपती संभाजी महाराज महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे जालना व छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांना अधिकचा वेळ लागत होता.
वाहनचालक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करुन वाहतुक कोंडीत भर घालत असल्याची बाब बदनापूर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरिक्षक मच्छिंद्र सूरवसे यांच्या लक्षात आल्यानंतर पदभार स्विकारताच त्यांनी खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाहने रस्त्यावर उभे करू नये या बाबत कडक सुचना दिल्या होत्या.
त्यानंतरही वाहन चालक रस्त्यावर धोकादायकरित्या वाहने उभी करीत असल्याचे आढळल्यावर शनिवारी सात वाहनांवर कारवाई करुन ती वाहने पोलिस ठाण्यात लावण्यात आली. सदर वाहनचालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहनचालकांना दंडही आकारण्यात आला आहे.
तर वाहनांवर कारवाई बदनापूर शहरातील वर्दळीच्या जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून धोकादायकरीत्या वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांसह फळ विक्रेते, व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिला आहे.