

Accident in Kedarkheda, two killed, one injured
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे रविवार दि. ३० रोजी रात्री घडली.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की सुरज संजय राऊत (१७) आणि आयुष सतीश पवार (१५) व अभय बारवकर (तिघेही रा.राजूर) हे तिघे भोकरदनवरून राजूरकडे एमएच २८, एयू ६६१८ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात जालन्याकडून भोकरदनकडे येणाऱ्या ट्रक एमएच २१, एएक्स ६२९९ ची दुचाकीला समोरून जोराची धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील सुरज संजय राऊत आणि आयुष सतीश पवार दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अभय बारवकर हा गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. हसनाबाद ठाण्याचे राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला केदारखेडा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमार्फत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविले. तर अपघातील इतर दोघांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या अपघातील ट्रकचा मालक फिरोज खान (रा. जालना) तर चालक विलास अर्दाड (रा. बीड) असून अपघातील दुचाकी ही नितीन खेत्रे (रा. देऊळगाव, ता. मेहकर) यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस ठाण्यात नोंद
या अपघाताची भोकरदन पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. समोरासमोर झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांचा जीव गेल्यानं परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन वाहनचालकांना प्रतिबंधित करावं, अशी मागणी सध्या परिसरात जोर धरत आहे.