

Cold wave in Jalna district, appeal to be vigilant
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा अचानक खाली आला असून सकाळी व रात्री थंड हवेची लाट पसरत असल्याने वातावरण थंडा-थंडा कुल-कुल झाले आहे. थंडीमुळे ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
जालना जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका जाणवत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण अधिक जाणवत आहे. तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. भारतीय हवामान विभागाने जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने वयोवृध्द नागरिकांसह लहान मुलांमधे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक दिसत आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत. ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांनाही थंडीचा सामना करावा लागत आहे.
थंड हवेमुळे सर्दी, खोकला व तापेच्या रुग्णात वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या वाढलेल्या थंडीमुळे उबदार कपड्यांना चांगली मागणी आली आहे. मफलर, गरम कपडे, कानटोप्या, विविध व्हरायटीच्या स्वेटरची मागणी वाढली आहे. पहाटे दाट धुके पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले नागरिक वाढत्या थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, कानटोपीसह इतर गरम कपडे घालताना दिसत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीने सकाळी व रात्री रस्त्यावरील वाहतूक मंदावत असल्याचे दिसत आहे. शहरातील विविध चौकांत थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवीत आहेत.
रुग्ण वाढले
शहरासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत थंडी वाढल्याने सर्दी, ताप व खोकला या व्हायरल आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. थंडीमुळे सुका मेव्याला मागणी वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे.