

आन्वा : भोकरदन तालुक्यात यंदा पाणी साठा चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे.तालुक्यात 17 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून, मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड केली आहे. यंदा गव्हाला पोषक हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. भोकरदन तालुक्यात नोव्हेंबर आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने अनेक भागात पिकांना त्याचा फटका बसला. परंतु, काही शेतकऱ्यांच्या रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांना वेगही आला असून, गव्हाच्या पेरण्यात मोठी वाढ झाली आहे.
गव्हाच्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात थंडी पडायला हवी. तेव्हाच गहू पीक बहरून येते. परंतु, गेल्या आठवडाभरापासून थंडी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सकाळी दाट धुकेही पडत असल्यामुळे पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेरणीत वाढ
यंदा भोकरदन तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड करण्यात आली असून नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने गव्हाच्या पेरण्यात वाढ झाली असून, यंदा 17 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.गव्हाचे क्षेत्र वाढले तरी वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.