

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडल्याचं समोर आलं आहे. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. गोळीबारात मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक देखील नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मात्र जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा गोळीबार नेमका का करण्यात आला याची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
घटनास्थळी पोलिसांना एक चाकू देखील आढळून आला आहे. सोबतच गजानन याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले असून, परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे. तर, मयत गजानन याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.