Manoj Jarange-Patil : मराठा वादळ आज अंतरवाली सराटीत; जरांगे सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दीची शक्यता | पुढारी

Manoj Jarange-Patil : मराठा वादळ आज अंतरवाली सराटीत; जरांगे सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दीची शक्यता

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा, सर्वसामान्य लोक हीच माझी शक्ती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शनिवारी (दि. १४) आयोजित सभेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव येणार आहेत. त्यामुळे ही सभा इतिहास घडवेल. सभेला येणाऱ्या सर्वांनी शिस्त पाळून सभेचा इतिहास शांततेत रचावा, असे आवाहन मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे यांनी शुक्रवारी येथे केले. (Manoj Jarange-Patil)

शनिवारी होणाऱ्या महासंवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. सभेची व्यवस्था पूर्ण झाली आहे. पाच हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह जे आवश्यक आहे ती सर्व व्यवस्था केली आहे. कितीही गर्दी असली तरी कोणताही मराठा घरी थांबणार नाही.सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, पोलिसांना त्रास देऊ नये. आचारसंहिता पाळावी. पायाखाली मुंगीही मरता कामा नये. आलेल्यांनी नियमांचे पालन करावे. सभेसाठी आम्ही आणखी ७० एकर क्षेत्र वाढवले आहे. सभेला खूप गर्दी होईल. सभेला किती लोक येतील याचा आकडा सांगणे अवघड आहे, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange-Patil : गोदा पट्ट्यातील १२३ गावांकडून सभेचा खर्च

गोदा पट्ट्यातील १२३ गावांनी पिकांच्या पैशातून हा सभेचा खर्च उचलला आहे. ३१ गावांतून फक्त पैसे घेतले. बाकीच्या गावांचे पैसे आम्ही घेतले नाहीत. आता यातून जे पैसे उरतील तेही परत करू, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले नाही

मुख्यमंत्र्यांशी दहा-बारा दिवसांपासून बोलणे झालेले नाही. मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा- त्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची मागणी आहे. हीच मागणी टिकणारी आहे.

Manoj Jarange-Patil : सभेची जय्यत तयारी

  • शंभर एकरावर सभा होणार होती, ती आणखी वाढवली
  • पार्किंगची व्यवस्था २०० एकरवर
  • सभास्थळी पोहोचण्यासाठी सात गेट
  • महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • पाणी, जेवण, आरोग्य व्यवस्था
  • २ ते ३ लाख जेवणाची पाकिटे
  • १२ लाख पाण्याच्या बाटल्या

फडणवीसांकडून फसवणूक

फडणवीस यांचा मराठा द्वेष आम्हाला दिसून येतो. ते ओबीसीवाल्यांकडे जातायेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायला लागले का, असा प्रश्न ‘, निर्माण होत आहे. फडणवीस यांच्याकडून होणारी फसवणूक चांगली नाही. धनगर आणि मराठा समाजाची फसवणूक त्यांनी केली. मी धनगर समाजाच्या आंदोलनाला जाणार. आम्ही आणि धनगर एकत्र आलो तर तुम्ही काय कराल, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.

निवडणुकीसाठई उभा राहणार नाही

राजकारण हा माझा मार्ग नाही. मला आरक्षणच पाहिजे. सरकारने माझ्यावर फार डाव टाकले. पण मी ते उधळून लावले. आरक्षण मिळाले तरी आमच्याकडे आणखी मुद्दे आहेत. आंदोलनातूनच न्याय मिळतो. राजकारणातून नाही. आम्हाला ओबीसीतच आरक्षण हवे, असे जरांगे म्हणाले…

हेही वाचा 

Back to top button