Maratha Reservation : मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी | पुढारी

Maratha Reservation : मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे, हे आरक्षण कायद्यात टिकणारे असावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यात मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्तात मोर्चाला सुरवात झाली. परंतु, वाळकेश्वर परिसरात मोर्चा रोखण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाबाबत पोलिसांशी किंवा शासकीय यंत्रणेशी पत्रव्यवहार करण्यात आला नव्हता. परंतु, वेगवेगळ्या ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातून मोर्चाचे मेसेज व्हायरल झाले होते. पदाधिकारी आणि कार्यकर्ते सकाळीच शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याजवळ जमले. घोषणा देत मोर्चाला सुरवात झाली. पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, तरीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. अखेर डी. बी. मार्ग पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. काही वेळानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सुनील नागणे यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ते कायद्यात टिकणारे असावे आणि मराठा म्हणून हे आरक्षण मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रावर न देता मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळावे, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Back to top button