

43 percent heavy rainfall subsidy allocation
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली होती. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार ६५१ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी ४६१ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ८३ हजार ६६० लाभार्थी शेतकऱ्यांना १८५ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सोयाबीन, तूर, कापूस, मकासह इतर पिकाना मोठा फटका बसला होता. नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.
त्यानंतर शासनाकडून प्रशासनास ४६१ कोटी अनुदान जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले होते. अनुदान प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून २ लाख ८३ हजार ६६० शेतकऱ्यांना १८५ कोटी १८ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले. जालना तालुक्यातील ९० हजार १६ लाभार्थ्यांसाठी ६४ कोटी २७ लाख, बदनापूर ६५ हजार ५३७लाभार्थ्यांसाठी ३४ कोटी १३ लाख, भोकरदन १ लाख ८ हजार ४७१ लाभार्थ्यांसाठी ५३ कोटी २८ लाख, जाफराबाद ३३ हजार २६९ लाभार्थ्यांसाठी ११ कोटी ५१ लाख, परतुर ५८ हजार ४२१ लाभार्थ्यांसाठी ४६ कोटी १२ लाख, मंठा ७१ हजार २९३ लाभार्थ्यांसाठी ४६ कोटी ९५ लाख, अंबड १ लाख ५ हजार ८५० लाभार्थ्यांसाठी ९७ कोटी २२ लाख, घनसावंगी ९६ हजार ७९४ लाभार्थ्यांसाठी ७८ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केवायसी नसल्याने निधी प्रलंबित
जिल्ह्यात १ लाख १६ हजार ७९५ शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांचा ७८ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी प्रलंबित राहिला आहे. प्राप्त झालेल्या निधीपैकी ४३ टक्के निधीचे वाटप प्रशासनाकडून करण्यात आले आहे.