

1.70 lakh metric tons of fertilizer stock remaining.
जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम हंगाम तोंडावर असताना जालना जिल्ह्यात खतांचा मोठा बफर स्टॉक उभारण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात युरियाचा तब्बल ९९.८४ टक्के सुरक्षित साठा पूर्ण झाला असून विविध रासायनिक खतांचा एकूण १ लाख ७० हजार ३९८ मेट्रिक टन साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यापैकी ४६ हजार ७९१ मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून सध्या १ लाख २३ हजार ६०७ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाने दिली.
२१ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, खरीप हंगामासाठी जिल्ह्यात युरियाची मागणी १ लाख १७ हजार ४८२ मेट्रिक टन इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत ७२ हजार ५०० मेट्रिक टनचे वाटप करण्यात आले असून १९ हजार ८५६ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.
एनपीके खताचा सर्वाधिक ५८ हजार ७६७ मेट्रिक टन साठा जिल्ह्यात उपलब्ध असून एसएसपी खताचाही २६ हजार ५२६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. त्यामुळे खरिपाच्या सुरुवातीला खतटंचाईची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र डीएपी खताच्या उपलब्धतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे चित्र समोर आले आहे. खरिपासाठी ४२ हजार ४६७ मेट्रिक टन मागणी असताना आतापर्यंत केवळ २७ हजार १०० मेट्रिक टन वाटप झाले आहे. सध्या जिल्ह्यात डीएपीचा १४ हजार ९४१ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षित खतसाठा उभारणीवर विशेष भर दिला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या माध्यमातून अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कृषी विभागाची साठेबाजीवर आणि बोगस खतांवर करडी नजर असणार आहे.