

12th exam : 37338 students will appear for the exam today
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस (बारावी) आज मंगळवार दि.१० रोजी पासून प्रारंभ होत आहे. १८ मार्चपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक असणार आहे. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ३७ हजार ३३८ विद्यार्थ्यांसाठी ७९ परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील संवेदनशील बारावीच्या ८ परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित केले जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यापूर्वीच बैठकीत दिले होते.
विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करण्यासाठी कॉपीला आळा घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी वातावरण निमिर्ती करून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा केंद्रावर चित्रीकरणही करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर २ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठे पथक त नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाभरात परीक्षेसाठी एकूण ६ भरारी पथके तैनात करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर लक्ष दिले जाणार आहे.
आठ संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, सेवली आणि श्रीमती इंदिरा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय रामनगर, राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय हिवराराळ, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, ओमशांती कनिष्ठ महाविद्यालय तळणी, सत्यशोधक उच्च माध्यमिक विद्यालय गो-षेगाव आणि साई केंब्रिज उच्च माध्यमिक शाळा वालसावंगी, सिध्देश्वर उच्च माध्यमिक शाळा ढोकसाळ.