

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी दत्ताभाऊ वरखडे यांनी विक्रीसाठी शेतातून 60 क्विंटल कापूस आयशर (एमएच13 आर 0889) मध्ये भरून गुरूवारी (दि. 23) पहाटे 2.30 च्या सुमारास रांजणी तुळजाई कृषी सेवा केंद्र ठिकाणी पार्क करून ठेवला होता. आज (दि.२४) सकाळी 8 च्या सुमारास पार्क केलेल्या ठिकाणी कापूस भरून ठेवलेला आयशर ट्रक नसल्याचे आढळून आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ सुत्रे हालवून सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यानंतर फिर्यादीकडे केलेल्या चौकशीमध्ये आयशर साधरण 60 ते 70 किलोमीटर गेल्यावर आपोआप बंद पडतो. त्यावरुन घनसावंगी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांनी वेगवेगळी 6 पोलीस पथके तयार केली. व घटनास्थळापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरापर्यंत चोरीस गेलेल्या आयशर ट्रक व कापसाचा परिसरामध्ये शोध घेतला. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर आयशर ट्रकचे सीसीटीव्ही फुटेज टाकले. त्यामुळे सदर चोरीस गेलेला आयशर व कापूस असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल एका ठिकणी आढळून आला. अवघ्या 6 तासांमध्ये पोलिसांनी ट्रक शोधून काढला.
ही कारवाई घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, रामचंद्र खलसे, संजय जाधव, बाबासाहेब डमाळे, सुनिल वैदय, गणेश मोरे, विनोद देशमाने, विठ्ठल वैराळ, कपिल अडियाल व चापोना गंगाराम कदम यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टाकसाळ करीत आहेत.
हेही वाचा