जालना : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन; शेतकरी आक्रमक | पुढारी

जालना : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन; शेतकरी आक्रमक

भोकरदन; पुढारी वार्ताहर : जालन्यातील भोकरदनमध्ये आज (दि.२२) शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन पुकराले आहे, त्याला पाठींबा देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी बरंजळा-लोखंडे पाटीवर बूधवारी चक्का जाम आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन विविध घोषणांनी परिसर दनाणून टाकला.

कापूस सोयाबीन भाव वाढ, बोंडअळी मुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनीने रोखलेला पिक विमा, कृषी पंपाला दिवसाला वीज व कृषी कनेक्शनवर वाढलेला लोड समतोलसाठी नवीन डीपी वाढवणे, ऊसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम, नाफेड मार्फत शासकीय हरभरा खरेदी आदि मागन्यांसोबत बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे, खरीप हंगाम व रब्बी हंगाम संपत आला मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नाही त्यामुळे पीक कर्ज देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित न करणे यांचा पाठपुरवठा व्हावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला प्रहार संघटना, स्वराज्य संघटना, छावा संघटना, बळीराजा फाऊंडेशन आदिनी पाठींबा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष काकासाहेब साबळे, बळीराजा फाऊंडेशन अध्यक्ष नारायण लोखंडे, स्वराज्य संघटना तालुका अध्यक्ष विकास जाधव, प्रहारचे जिल्हाध्यक्ष श्रीमंता राऊत, नारायण मिसाळ, छावा संघटनेचे आप्पासाहेब जाधव, सभांजी बिग्रेड तालुका अध्यक्ष श्रीराम चोरमारे, तुळशीराम साबळे, ईश्वर जाधव, सतीश जाधव, कैलास पवार, राजू साबळे, भगवान साबळे, अनिल भुतेकर, संदीप भोकरे, नारायण बकाल, अनिल साबळे, प्रदीप लोखंडे, आंदीसह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 

राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री विदेश दौऱ्यावर गेल्या आठवड्यात गेलेले आहेत. पंचनामे करून ४ महिने उलटले मात्र अद्यापही नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचा लाभ नाही. सरकार शेतकऱ्यांकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास शेतकरी यानंतर तीव्र आंदोलन छेडतील.

-नारायण लोखंडे, (अध्यक्ष, बळीराजा फाऊंडेशन)

आम्ही सरकार मध्ये असलो तरी शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये, नाहीतर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

-श्रीमंता राऊत (प्रहार जिल्हाध्यक्ष)

अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला जात गेला आहे. त्यामध्ये पीकविम्याचा लाभ नाही. कापूस सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्या नसता आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू.

-विकास जाधव (स्वराज्य संघटना)

 

हे वाचलंत का? 

Back to top button