

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : वाहनाच्या धडकेत सीमा सुरक्षा दलातील जवान जागीच ठार झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर- वडीगोद्री महामार्गावर भालगाव फाट्यावर शुक्रवारी (दि.३) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. हनुमान यशवंत लिपणे (वय ४३, रा. वडीगोद्री, ता.अंबड) असे मृत जवानाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमान लिपणे हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. चार दिवसापूर्वी मुलीच्या लग्नासाठी ते सुट्टीवर आले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे काही कामानिमित्त दुचाकीवरून (एमएच.२१ ए.जे .५७९९) ते गेले होते. तेथून वडीगोद्री या गावी परत येत असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने (एमएच.०६ ए.जी.७५६९) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळावरुन वाहन चालक पसार झाला. परंतु, ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हनुमान लिपणे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. आता त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांची मुले पोरकी झाली आहेत. त्यांच्या निधनावर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडीगोद्री येथे अंत्यविधी करण्यात आले.
हेही वाचा