

परतूर; पुढारी वृत्तसेवा : तापी नदीची वाळू घेऊन वरफळ ते चिंचोली दरम्यान ट्रक चालकाने दुचाकीवर परतूरला येत असलेल्या दोघा पती पत्नीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादी वरून परतूर पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी (दि २७) फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सुमारास मळीराम केशवराव देशमुख (वय ५७ वर्षे), नंदाबाई मळीराम देशमुख (वय ५२ वर्षे) हे दाम्पत्य परतुर येथे निघाले होते. याचदरम्यान एका वाळुच्या ट्रकने (क्र.एमए ४० बिएल ४३८८) जोराची धडक दिली. यामध्ये मळीराम देशमुख हे जागीच ठार झाले, तर नंदाबाई या गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय परतुर दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणी ट्रक चालक राजू गणेश गायकवाड (रा. आर्वी जि. परभणी) याच्या विरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.