

The level of election campaigning in Hingoli has dropped.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचाराने वेग घेतला आहे. २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे व शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. विकास कामांच्या मुद्यांवर निवडणुक लढण्याऐवजी हा कसा वाईट, तो किती बदमाश याचीच उजळली बांगर-मुटकुळे यांच्याकडून केली जात असल्याने मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे.
तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याची टिका दोन दिवसांपुर्वी केली होती. त्यांच्यामुळेच शहरात मटका, जुगार, वाळु माफिया, अवैध गुटखा विक्रीचे प्रकार सुरू झाले असा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला होता. एवढ्यावरच न थांबता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे रडत सांगणारे बांगर एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटी मिळाल्याबरोबरच त्यांच्यासोबत गेले असा आरोप त्यांनी केला. यावर आमदार बांगर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.
तान्हाजी मुटकुळे हा घरात येऊ द्यावा असा माणूस नाही, त्याची आया, बहिणीवर वाईट नजर आहे. तो महिलांवर अत्याचार करतो अशा शब्दात गंभीर आरोप केले. या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या मायबाप जनतेने यांना घरामध्ये येऊ देऊ नये त्यांची वाईट नजर आहे. हे घरामध्ये जर आले तर यांना चपलेने मारायला पाहिजे इतकेच नाही तर आपल्याकडे मुटकुळे यांची एक क्लिप असून ती जाहीर केल्यास त्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा बांगर यांनी दिला.
या विधानांमुळे हिंगोलीतील राजकीय वातावरण तापले असून शेवटच्या तीन दिवसात आणखी हा प्रचार किती खालची पातळी गाठतो हे पहावे लागणार आहे. हिंगोली नगर पालिकेतील प्रचार आता मुद्यांवरून गुद्यांवर येतो की काय? अशी भिती मतदारांना वाटु लागली आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांनी एकमेकांचे असे वाभाडे काढणे कोणालाच आवडलेले नाही.
भाजपचे आमदार मुटकुळे यांच्याकडून शिवसे नेचे आमदार संतोष बांगर यांची गुन् हेगारी पार्श्वभुमी, त्यांच्यामुळे जिल्ह्यात अवैध धंदे कसे वाढले याचा पाढा वाचला जातोय तर त्याला उत्तर देताना आमदार बांगर यांनी थेट मुटकुळे यांच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त करत आरोप सुरू केले आहेत. एकंदरीत मागील चार ते पाच दिवसांपासून हिंगोली पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार मुटकुळे व आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. दोघांनीही पातळी सोडून एकमेकांवर टिका सुरू केली आहे. परिणामी, प्रचाराची पातळी घसरली असल्याचे चित्र आहे.
निवडणुक ही चार दिवसाची असते. संबंध मात्र कायमस्वरूपी असतात. हिंगोली पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आरोप करताना वैयक्तिक आरोप केले जाऊ नयेत, दोघांनीही संयम पाळणे गरजेचे आहे असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिला आहे.