

A hundred policemen raided the residence of MLA Bangar
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोलीतील निवासस्थानी मंगळवारी पहाटे शंभर पोलिसांनी धाड टाकून झडती घेतल्याचा आरोप विधानपरिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी केला आहे. भाजप आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा पाटील यांनी खुलासा केला असून, या प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. ते मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील पालिका निडणुकांवरून दोन्ही आमदार आमनेसामने आले असून, परस्परांवर खालच्या पातळीवर टीका सुरू आहे. त्यातच या धाडसत्रामुळे शिंदे गटात संतापाचे वातावरण पसरले आहे. शिव-सेनेचे विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती आता चांगली आहे.
कळमनुरी आणि हिंगोली शहरावर सेनेचा भगवा फडकणार आहे. परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. संतोष बांगर यांच्या घरावर पहाटे पाच वाजता १०० पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतली. संतोष बांगर यांची ७५ वर्षांची आई आजारी असताना त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्रास देणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. त्यांच्या घरातील कपाट पोलिसांनी उचकले. वास्तविक आमदार असल्याने त्यांच्या घराची झाडाझडती करताना त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
त्याबाबत आपण विधानसभाध्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधला, पण विधानसभा सभापतींकडून तसा कोणताही आदेश वा मेल आला नाही. मग ही धाड कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली? हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळेंच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्यांतील आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहोत.
राज्यात आम्ही सत्तेतील समान वाटेकरी आहोत. स्थानिक आमदार पोलिसांवर दबाव टाकत आहेत, ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत, असे पाटील म्हणाले, एखाद्या आमदाराच्या घराची झाडाझडती ही दहशतवादी किंवा गुंडाच्या घराची झाडाझडती केल्यासारखी घेण्यात आली. निवडणुका या काही काळापुरत्या आहेत, लोक आपल्याकडे बघत असतात, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.