

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांनी दिला.
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे संजय आबाराव देशमुख यांचा त्यांचा मुलगा निखील देशमुख व गजानन देशमुख यांच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होता. यामध्ये त्यांच्यात कुरबुरी होत होत्या. त्यानंतर ४ जून २०२२ रोजी संजय यांना त्यांची मुले निखील व गजानन यांनी वेळुची काठी, लाकडी राफ्टर याने मारहाण करून जीवे मारले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, शिवाजी देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ६ जून २०२२ रोजी सेनगाव पोलिसांनी निखील व गजानन यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, जमादार टी. के. वंजारे, सुभाष चव्हाण, राजेश जाधव यांच्या पथकाने अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी निखील व गजानन यांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील ॲड. सविता देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲड. एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार पी. ए. मारकड यांनी काम पाहिले.