

वसमत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४० ते ४१ अंशांवर पोहोचला असताना, विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागावरच लोडशेडींगचा बोजा टाकल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरात वीज सुरळीत ठेवत गावाकडे मात्र तीन-तीन तास वीज बंद ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
उकाड्याने आधीच हैराण झालेल्या नागरिकांना संध्याकाळी ६ ते ९ या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचे अक्षरशः हाल होत आहेत.
उन्हात जगायचं कसं? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, या लोडशेडिंगबाबत विचारणा केली असता संबंधित अभियंत्याने दिलेल्या स्पष्टीकरणाने संतापात अधिक भर पडली आहे. ज्या भागात वीज बिलाची वसुली (रिकव्हरी) ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी लोडशेडिंग घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, थकबाकीदारांमुळे संपूर्ण गावाला शिक्षा दिली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
वीज ही मूलभूत गरज असताना, तिचा असा भेदभाव करून पुरवठा केल्याने प्रशासनाविरोधात रोष वाढत असून, लवकरात लवकर हा अन्याय थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.