

Shinde Sena's Dr. Kyatmwar joins BJP
खदीर अहेमद
वसमत : येथे दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत दाखल झालेल्या डॉ. मारोती क्यातमवार यांनी सोमवारी अचानक भाजपामध्ये उडी घेतली. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वसमतच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देखील दाखल केली. त्यांच्या या हनुमान उड्या नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत.
येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मारोती क्यातमवार हे खासदार राजीव सातव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. खासदार सातवांमुळेच ते काँग्रेसमध्ये रमले होते. मात्र खासदार सातवांच्या निधनानंतर त्यांचे काँग्रेसमध्ये मन रमलेच नाही. पक्षाच्या नेत्यांनी त्यांना मदतही केली नाही.
त्यामुळे नाराज होत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मुंबई येथे शिदेसेनेत प्रवेश केला. दरम्यान, डॉ. क्यातमवार यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशामुळे वसमत तालुक्यात पक्षाला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तर पालिका निवडणुकीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र वसमत पालिकेमध्ये राष्ट्रवादी (अजित पवारगट) व शिंदेसेनेची युती झाली आहे. त्यातच नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले.
या संदर्भात आमदार राजेश नवघरे व आमदार संतोष बांगर यांच्यात चर्चाही झाली असून नगरसेवक पदाचे जागा वाटपही झाले. दरम्यान, शिंदेसेनेने नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिल्यामुळे डॉ. क्यातमवार पुन्हा एकदा नाराज झाले. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी भाजपात प्रवेश करून जय श्रीरामचा नारा देत भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यांच्या हनुमान उड्यांमुळे वसमतच्या राजकीय वर्तुळातून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
या संदर्भात डॉ. क्यातमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले असून वसमतच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.