

हिंगोली / वसमत, पुढारी वृत्तसेवा : पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने पथकांची स्थापना केली असून या पथकांद्वारे उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान शुक्रवारी शहरातील एका जिनिंग जवळील मोकळ्या मैदानावर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय तोडेवाले, अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, गणेश वाबळे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी तेथे जमलेल्या लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले.
जमादार तोडेवाले यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख अनवर शेख रहमान याच्यासह एका महिलेविरुद्ध निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणे तसेच लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.
आदर्श आचारसंहिता भंगप्रकरणी तिघांवर गुन्हा
वसमत येथे सभा असल्याचे बॅनर लाऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दूसरा गुन्हा दाखल झाला आहे. वसमत येथील ग्रामीण पोलिस ठाणे व गवळी मारोती मंदिर ते आसेगाव टी पॉइंट रोडवरील दुभाजकावर २२ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभेचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले.
यावरून वसमत पालिकेचे कर्मचारी अरविंद शिकारी यांनी वमसत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शहरात बॅनर लाऊन शहराचे विद्रूपीकरण करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे नमूद केले, यावरून वसमत शहर पोलिसांनी वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे, कामगार आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष शेख रफी सुलेमान, विश्वनाथ बोखारे यांच्याविरुध्द आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.