

सेनगाव : तालुक्यात रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून अशा गैरप्रवृत्ती व अवैध रेतीमाफिया विरुद्ध सेनगाव पोलीसांनी रणसिंग फुंकले असून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परसह रेती माफियां विरुद्ध २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई करून तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल सेनगाव पोलीसांनी जप्त केला.
सेनगाव तालुक्यात रेतीची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक चालू असून याला कायम लगाम लावण्यासाठी सेनगाव पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केल्या जात आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास वडहिवरा येथील गणेश संतोष कोकाटे व्यवसाय चालक हा विनापरवाना बेकायदेशीरित्या व स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक करत असल्याचे समजले.
सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नागेश शेट्टीवार, बीट जमादार जीवन मस्के, जयस्वाल यांच्या पथकाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना संतोष कोकाटे यास एक लेलँड कंपनीच्या पिवळ्या रंगाचे हा बॉडी टिप्पर ज्याचा गाडी क्रमांक एम एच ३८ ए.ई. १४१४ असून ज्याची किंमत ७ लाख रुपये त्यामध्ये दोन ब्रास अवैध वाळू भरलेली ज्याची किंमत १० हजार रुपये अशी एकूण ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सेनगाव पोलिसांनी पकडला.
सेनगाव तालुक्यात सेनगाव पोलिसांकडून रेतीमाफीयाविरुद्ध होत असलेले सर्जिकल स्ट्राइक सुरू झाल्याने रेतीमाफीचे प्रचंड धाबे दणाणले असून अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.
सेनगाव ठाणे हद्दीत अवैध धंदे व गैर प्रवृत्ती मोडीस काढण्यातसाठी सेनगाव पोलीस प्रयत्नशील असून ठाणे हद्दीत अवैध रेती उपसा अथवा विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या अवैध रेतीमाफी यांची आता कदापी खैर नाही असा गर्भित इशारा स.पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिला.