

छत्रपती संभाजीनगर : नशेची तलफ भागवण्यासाठी आणि शहरात रेकी करून छोट्या-मोठ्या चोऱ्या करण्यासाठी दुचाकी पळवणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने झेंडा चौक परिसरातून बेड्या ठोकल्या. प्रकाश साईराम शिंगाडे (३४, रा. जय भवानी नगर, गल्ली नं. ०२, मुकुंदवाडी) असे या अटकेतील सराईत चोराचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
अधिक माहितीनुसार, एकजण झेंडा चौक भागात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने पोलिसांनी सापळा रचून शिंगाडेला ताब्यात घेतले. दुचाकीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व कोणताही पुरावा सादर केला नाही.
पोलिसांनी अभिलेख तपासले असता, ती दुचाकी चोरीची असल्याचे आणि याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ११ जुलै रोजी रात्री २ ते पहाटे ६ च्या दरम्यान, जाधववाडीतील जयमल्हार हॉटेलसमोरून विलास थोरात (रा. मयूर पार्क, हर्सूल) यांची दुचाकी चोरीला गेली होती.
पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी एक हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरल्याची आणि ती जवळच लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या. पुढील तपासासाठी आरोपीला सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने केली.
छोट्या- मोठ्या चोऱ्यांसाठी वापरायचा दुचाकी
आरोपी प्रकाश शिंगाडे हा सराईत चोर असून त्याच्यावर आतापर्यंत २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याची चोरीची पद्धत अत्यंत चलाख होती. तो जालना येथून एखादी दुचाकी चोरी करून ती शहरात आणायचा आणि शहरातील दुचाकी चोरून ती जालन्यात नेऊन लावायचा. याच चोरीच्या दुचाकीवरून तो शहरात फिरून रेकी करत असे आणि छोट्या-मोठ्या चोऱ्या करण्यासाठी या वाहनांचा वापर करत होता. तो नशाखोर असून, नशेच्या आहारी गेल्यानेच तो या चोऱ्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.