Hingoli Turmeric Theft : गोदामातून हळदीचे कट्टे लंपास

२.२५ लाख रुपयांची चोरी, ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

हिंगोली :शहरालगत लिंबाळा मक्ता शिवारातील गोदामाचे शटर वाकवून चोरट्यांनी तब्बल २.२५ लाख रुपये किमतीचे हळदीचे ३० कट्टे लंपास केल्याची घटना समोर आली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय असून, याप्रकरणी सोमवारी रात्री हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील तान्हाजी शिंदे यांची माऊली ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचा शेतीमाल खरेदी केला जातो. खरेदी केलेला शेतीमाल साठवण्यासाठी लिंबाळा मक्ता शिवारात कंपनीचे गोदाम आहे. या गोदामात हळद तसेच इतर शेतीमाल ठेवण्यात आला होता.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime : नशेची तलफ भागवण्यासाठी दुचाकी चोरी ; सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोदामाला लक्ष्य केले. गोदामाचे शटर वाकवून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गोदामात ठेवलेल्या हळदीच्या कट्ट्यांपैकी ३० कट्टे चोरून नेले. या हळदीची अंदाजे किंमत २ लाख २५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी तान्हाजी शिंदे गोदामाकडे गेले असता त्यांना शटर उघडे आणि वाकलेल्या अवस्थेत दिसले. संशय आल्याने त्यांनी गोदामाच्या आत जाऊन पाहणी केली. त्यावेळी हळदीचे कट्टे गायब असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना कळविले.माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले आणि जमादार असलम गारवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Crime News
Vaijapur Food Safety : स्वच्छतेचा बोजवारा? कचोरीत आढळली उंदराची विष्टा; प्रशासनाकडून दुकान सील!

पोलिसांनी गोदामाची पाहणी करून चोरीच्या घटनेची माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला, चोरीनंतर ते कोणत्या दिशेने गेले आणि या टोळीचा पूर्वीच्या चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  • तान्हाजी शिंदे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२.२५ लाख रुपयांच्या हळदीची चोरी झाल्याने परिसरातील शेतीमाल साठवणूक करणाऱ्या व्यापारी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news