

Protest in Hingoli against increased electricity bills
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात घरगुती ग्राहकांना वाढीव दराने देण्यात आलेले वीज देयक तातडीने रद्द करून योग्य वीज देयक द्यावे या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास पुढे अधिकाऱ्यांचे डोके फोडो आंदोलन करण्याचा इशारा शिव-सेना शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी दिला.
जिल्ह्यात वीज कंपनीच्या वतीने घरगुती ग्राहकांचे वीज मिटर बदण्याचे काम सुरू आहे. मात्र या मिटरमुळे नागरिकांना अवाच्या सव्वा वीज देयक येत असून यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकारामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल बजावो आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार सोमवारी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिव सेना शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, औंढा तालुकाप्रमुख गणेश देशमुख, संतोष देवकर, देविदास कुंदर्गे, वैभव देशमुख, विठ्ठल चौतमल, आनंदराव जगताप, जगदिश गाढवे, वाकळे, जगन्नाथ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वसीम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. नवीन वीज मीटर व वाढीव वीज देयकाच्या विरोधात आमचे आंदोलन आहे. या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही अधिकाऱ्यांना जाग येत नाही.
पुढील काळात अधिकाऱ्यांचे डोकेफोडो आंदोलन केले जाईल. त्यानंतर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, गुन्हे दाखल होणे आमच्यासाठी नवीन नाही, पण नागरिकांना त्रास होऊ देणार आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आताच विचार करावा, असा इशाराही देशमुख यांनी दिला.