

irrigation backlog river linking projects Former MP Shivaji Mane
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी नदीजोड प्रकल्प होत असून या माध्यमातून पैनगंगा नदीचा वापर करीत हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेषाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या पर्यायामुळे प्रस्तावित खरबी बंधाऱ्याद्वारे वळविल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रकल्प देखील आपोआप रद्द होईल असे हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाज ीराव माने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.
१५ ऑक्टोबरपर्यंत राज्य शासनाने राज्यातील जिल्ह्यांच्या सिंचनाचे प्रस्ताव मागवून घेतले आहेत. या संदर्भात रविवारी जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भामध्ये बैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख हेक्टर जमिनीच्या सिंचनाचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे. याच प्रकल्पाला वाढीव स्वरूप देऊन सदरील पाणी पैनगंगा नदीत सोडून खडकपूर्णा मार्गे येलदरी धरणात आणण्यात यावे व त्यापुढे राज्य शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार वेलदरीतून भानखेडा मार्गे कयाधू नदी पात्रात पाणी सोडल्यास कयाधू बारमाही वाहती राहील. शिवाय या पाण्यामुळे नदीवर मोठ्या स्वरूपाचे प्रकल्प देखील उभारता येतील.
त्याचबरोबर पैनगंगा नदीतून वाशिम मार्गे पैनगंगा नदीत पाणी सोडल्यास सदरील पाणी ईसापुर धरणात समाविष्ट होणार असून त्यामुळे नदिड जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणात सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. येलदरी मार्गे भानखेडा येथून कयाधू नदीत पाणी सोडल्यास खरबी येथील बंधाऱ्यातून ईसापुर धारणा मध्ये वळविण्यात येणाऱ्या पाण्याची गरज पडणार नाही. शिवाय केवळ हिंगोली करिता खरबी बंधारा निर्माण झाल्यास परिसरातील सिंचन मोठ्या प्रमाणात वाढेल.
याचबरोबर राज्यपालांनी जो जिल्ह्याकरिता १५ हजार हेक्टर सिंचन अनुशेष मंजूर केला आहे. त्याकरिता काही प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. दुसरी विशेष बाब म्हणजे कयाधू खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध नसल्यामुळे सदरील पाणी पैनगंगा खोऱ्यामध्ये वळविणे शासकीय नियमानुसार देखील शक्य नाही. असे असताना देखील शेकडो कोटी रुपयांचा होत असलेला चुराडा टाळून वरील पर्यायांचा गांभीयनि विचार केला तर केवळ हिंगोलीच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचा देखील सिंचन अनुशेष आणि प्रश्न मार्गी लागेल असे यावेळी शिवाजीराव माने यांनी सांगितले.