

Preparations for the Mahashivratri Yatra Festival
औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा :
येथे ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ज्योतिर्लिंग नागेश्वर नागनाथ मंदिर संस्थानकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र यात्रा महोत्सव साजरा होणार असून यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.
१५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान यात्रा महोत्सव असून १५ फेब्रुवारी महाशिवरात्र पर्वकाळात अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे दुपारी ४ ते ६ कीर्तन होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी संतराम बाबू महाराज यांची कीर्तन २ ते ४ वाजेपर्यंत होणार, १७ फेब्रुवारी सुभाष महाराज राजापूरकर यांची रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहे.
१८ फेब्रुवारी रोजी रामदास भानगाव चाकूरकर शास्त्री यांचे दुपारी १२ ते २ कीर्तन होणार आहे. रात्री दहा वाजता मंदिर प्रांगणात रात्री दहा वाजता ऐतिहासिक रथोत्सव होणार असून पाच प्रदक्षिणा मंदिराला घातल्यानंतर होणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी नामदेव महाराज ढवळे चाटकर यांच्या काल्याचे किर्तन १० ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. या महाशिवरात्री उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकादशीपासून सुरू होणारी ही यात्रा महाशिवरात्रीपर्यंत चालते. हरिहर कुंड आणि मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. महाशिवरात्रीला पहाटेपासूनच विशेष महापूजा, अभिषेक, रुद्राभिषेक आणि पूजा विधी पार पाडतात.