Shetkari Sahitya Sammelan | शिरल्याच्या शेतकरी पुत्राला अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान
Akhil Bharatiya Marathi Shetkari Sahitya Sammelan
जवळा बाजार : महाबळेश्वर येथे २१ व २२ फेब्रुवारीरोजी होणाऱ्या १४ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्ञानदेव राऊत यांची निवड करण्यात आली आहे. वर्धा येथील शेती अर्थप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संमेलनाचे संयोजक अॅड. सतीश बोरूळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली.
डॉ. ज्ञानदेव राऊत हे हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र असून, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारजवळ असलेल्या शिरला या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. सध्या ते किल्लारी (जि. लातूर) येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
मराठी साहित्य आणि शेतकरी चळवळ हा त्यांच्या संशोधनाचा व चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांचे वडील नेमाजी राऊत हे शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विविध आंदोलनांसह सुरेगाव येथील शेतकरी संघटनेच्या गोळीबाराचे ते साक्षीदार होते. या गोळीबारात निवृत्ती कऱ्हाळे, परसरामजी कऱ्हाळे व ज्ञानदेव टोंपे या शेतकऱ्यांना हौतात्म्य आले होते. कुटुंबातून लाभलेल्या शेतकरी चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे डॉ. राऊत यांचे लेखन अधिक वस्तुनिष्ठ व जैविक जाणिवेतून साकारलेले दिसते.
‘प्रतिष्ठान’, ‘साधना’, ‘मुराळी’, ‘विचारशलाका’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘शेतकरी संघटक’, ‘अक्षरपेरणी’, ‘अक्षर गणगोत’ आदी अग्रगण्य साप्ताहिके, नियतकालिके व दैनिकांमधून त्यांचे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध झाले आहे. ‘शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध’ हा त्यांचा संशोधनग्रंथ जाणकार साहित्यिक व अभ्यासकांमध्ये चर्चिला गेला आहे. या ग्रंथाला ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून, प्रसिद्ध कथाकार व समीक्षक भास्कर चंदनशिव यांनी मोलाची पाठराखण केली आहे.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन यापूर्वी वर्धा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पैठण, अलिबाग, कोल्हापूर, नाशिक, रावेरी, अमरावती आदी ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झाले आहे. यापूर्वी संमेलनाच्या अध्यक्षपदी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, डॉ. शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, इंद्रजीत भालेराव, भास्कर चंदनशिव, वसुंधरा काशीकर, प्रज्ञा बापट, तुळशीराम बोबडे, डॉ. किशोर सानप, भानू काळे, सरोजताई काशीकर, श्रीपाद अपराजित आदी साहित्यिक, समीक्षक व शेतकरी चळवळीचे अभ्यासक अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
महाबळेश्वर येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी हिंगोली जिल्ह्याच्या सुपुत्राची निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे. या निवडीबद्दल कवी इंद्रजीत भालेराव, शेषराव मोहिते, साहित्यिक प्रकाश मोगले, पी. विठ्ठल, कथाकार प्राचार्य नागनाथ पाटील, अण्णा जगताप, शे. मो. नाईकवाडे, शेतकरी संघटनेचे नेते उत्तमराव वाबळे, अनंत पवार, मुरलीधर अण्णा मुळे, दिलीपराव वैद्य, बापूराव चौधरी, रामकिशन अप्पा रुद्राक्ष, देविप्रसाद ढोबळे, महादजी चव्हाण, संजय सिंगारे, मारोतराव कुर्हे, मारोतराव गोमासे, बाळू पाटील, सरपंच नवनाथ पाटील, गोविंद गोमासे, दिलीप पांढरे, प्रा. सखाराम कदम, डॉ. ज्ञानेश्वर गाडे, डॉ. प्रविण काळे, विक्रम शिंदे, प्रा. गजानन मुळे, प्रा. पंढरीनाथ बांगर, सुनील टाले, विजय लांडगे, राहुल लाहोटी, मंगेश राऊत, महेश पुरूषोत्तम लाहोटी, सजन राऊत, माणिकराव राखोंडे, महेश पुंड, बाळू सापतकर, प्राचार्या सुनीता कातोरे, अशोक दाडगे आदींसह सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

