

Pragya Satava changed the party for selfish reasons; Congress's attack
हिंगोली; पुढारी वृत्तसेवाः
काँग्रेसने सहानुभूतीतून दोनदा विधान परिषदेची संधी देऊनही आ. डॉ. प्रज्ञा सातव यांनी विकासासाठी नव्हे, तर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिवंगत राजीव सातव आणि माजी मंत्री रजनी सातव यांच्या विचारांशी प्रतारणा करून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांच्या या कृतीला काँग्रेस कार्यकर्ते चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे, जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, डॉ. रमेश शिंदे, महंमद जकी कुरेशी, गजानन देशमुख, विनायक देशमुख, मिलिंद उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन नाईक पुढे म्हणाले की, डॉ. सातव यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देताना पक्षासमोर अनेक आव्हाने होती. अल्पसंख्याक आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांची मागणी असतानाही पक्षाने राजीव सातव यांच्यावरील प्रेमापोटी प्रज्ञा सातव यांना संधी दिली. मात्र, त्यांनी भाजपच्या षडयंत्राला बळी पडून लोकशाही तुडवणाऱ्यांच्या गोटात जाणे पसंत केले.
... तर कार्यकर्ते मोकळा श्वास घेतील!
यावेळी पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे यांनीही डॉ. सातव यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस हा वटवृक्ष आहे. कुणी एक व्यक्ती गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नाही. डॉ. सातव यांचे स्वतःचे कोणतेही कर्तृत्व नव्हते, त्यांना केवळ राजीव सातव आणि रजनी सातव यांच्या पुण्याईने पदे मिळाली. उलट त्यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवण्याऐवजी नुकसानच केले. त्यांच्या जाण्याने आता काँग्रेस कार्यकर्ते मोकळा श्वास घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले