

आखाडा बाळापूर ः कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे 16 डिसेंबर रोजी गरोदर मातांच्या लसीकरणाबाबत अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला असून, संपूर्ण लसीकरण प्रक्रिया डॉक्टरांच्या प्रत्यक्ष देखरेखीशिवाय केवळ परिचारिकेच्या भरवशावर सुरू असल्याचे उघड झाले. हे लसीकरण अंगणवाडीत केल्या जात होते. विशेष म्हणजे संबंधित समुदाय आरोग्य अधिकारी बाळापूर येथे स्वतःचा खाजगी दवाखाना चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गरोदर मातांचे नियमित तपासणी व लसीकरण होणे अपेक्षित असते. मात्र कांडली येथील उपकेंद्रात डॉक्टरांची अनुपस्थिती ही नित्याची बाब बनली असून, सर्व जबाबदारी परिचारिकेवरच सोपवण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे गरोदर मातांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र रामेश्वर तांडा अंतर्गत कांडली येथे आरोग्य वर्धिनी उपकेंद्र असून स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेळा लसीकरणाच्या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित नसतात.
काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये तातडीने वैद्यकीय सल्ल्याची गरज असताना केवळ परिचारिकेच्या अनुभवावर उपचार केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे माता व गर्भातील बाळाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, संबंधित कांडली व बोथी येथील समुदाय आरोग्य अधिकारी हे आखाडा बाळापूर येथे स्वतःचा खाजगी दवाखाना नियमितपणे चालवत असल्याने शासकीय कर्तव्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. शासकीय आरोग्य सेवेत नियुक्त असताना खासगी प्रॅक्टिसवर भर दिला जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या प्रकाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ताराचंद जाधव यांना ग्रामस्थांनी डॉक्टर शिबिरास उपस्थित नाही असे सांगितले असता डॉ. ताराचंद जाधव यांनी तुम्ही लेखी तक्रार करा मी वरिष्ठांना कळवतो असे सांगितले. ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.