

Opposition to diverting Kayadhu river water to Isapur dam
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून ते पाणी इसापूर धरणात सोडून नांदेडला पळविण्याचा घाट घालण्यात आला आहे. कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविल्यास जिल्ह्याचे वाळवंट होणार असल्याने खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे हे मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कयाधू नदीवर खरबीजवळ बंधारा बांधून ते पाणी इसापूर धरणात सोडण्याचा घाट सुरू आहे. कयाधूचे पाणी वळविले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. भविष्यात पाणीप्रश्नही मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊ शकतो. या बंधाऱ्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला न्याय मिळवा यासाठी डॉ. रमेश शिंदे यांनी २३ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत खरबी बंधारा रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार डॉ. शिंदे यांनी केला आहे. आमच्या शेतकऱ्यांवर आधी गोळ्या झाडा नंतरच बंधाऱ्याचे काम सुरू करा अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणास शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत कयाधू नदीतील पाणी चोरीला कडाडून विरोध केला आहे.
कयाधू नदीवरील खरबी वळण बंधारा हा नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे. या कयाधू नदीच्या खोऱ्याचे पाणी नियमानुसार दुसरीकडे वळविता येत नाही तरीही शासन पाणी वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहे. यासाठी मला बलिदान देण्याची वेळ आली तरी तयार असल्याचे डॉ. रमेश शिंदे यांनी सांगितले.