

Obstruction of government work case: Two sentenced to six months in prison
हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा मक्ता शिवारात एसटी चालकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दोघांना सहा महिने कारावास व प्रत्येकी २५०० रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांनी शुक्रवारी दिला.
हिंगोली आगाराचे चालक विश्वनाथ घुगे हे २२ ऑगस्ट २०१९ रोजी परभणी ते हिंगोली हि एसटी घेऊन हिंगोलीकडे येत होते. यावेळी एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी लिंबाळा मक्ता शिवारात त्यांच्या एसटी समोर दुचाकी लाऊन एसटी अडवली. यावेळी दुचाकीवरील गोविंदू कहऱ्हाळे, राजेश कहऱ्हाळे या दोघांनी विश्वनाथ यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चालक विश्वनाथ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट २०१९ रोजी गोविंदू व राजेश यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोविंदू व राजेश यांना सहा महिन्याचा कारावास व प्रत्येकी २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. एन. एस. मुटकुळे, अॅड. एस. डी. कुटे यांनी काम पाहिले त्यांना अॅड. सविता देशमुख यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार पी. बी. धुर्वे यांनी काम पाहिले.