

Hingoli Political News NCP Sharad Pawar faction setback Hingoli
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बुधवारी सायंकाळी पुणे येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा सत्कार केला. या पक्ष प्रवेशामुळे हिंगोलीत शरद पवार गटाला चांगलाच हादरा बसला असून यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकीचे आरक्षण सोडती नंतर राजकीय भूकंप सुरू झाले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पक्षांतर होऊ लागले आहे. तीन वेळेस कॉंग्रेसचे आमदार म्हणून हिंगोलीचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला राजकीय भूकंपाचा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी बुधवारी दुपारी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा अजित पवार गटात पक्ष प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, अमेर अली, आरेफ बागवान, अॅड. स्वप्नील गुंडेवार, शेख निहाल, शेख शकील, अॅड. अमित कळासरे, महेंद्र धवाले, संतोष गुष्ठे, माजी नगरसेवक बाबाभाई यांच्यासह कळमनुरी येथील माजी नगरसेवकांनी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (अजित पवारगट) प्रवेश केला. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश नवघरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांची उपस्थिती होती.
माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदेसमर्थक होते. अजित पवारांनी चव्हाण यांना कायम बळ दिले. मध्यंतरी काही काळ दिलीप चव्हाण हे शरद पवारांच्या पाठीशी राहिले. परंतु आता ते पुन्हा अजित पवारांकडे गेले आहेत. प्रवेशावेळी अजित पवारांनी दिलीपराव असा आदरवाचक उल्लेख करत जुन्या संबंधांना उजाळा दिला. तसेच पुढील काळात चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.