

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या वर्षात 388 अपघात झाले. यात 222 जणांना जीव गमवावा लागला असून, 308 जणांना गंभीर दुखापत झाली. वाहन चालकांचा भरधाव वेग व निष्काळजीपणामुळे स्वतःचा जीव जात आहे. याशिवाय इतरांच्या जीवावरही बेतत आहे.
जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून, राज्य रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून, कमी वेळात जास्त अंतर कापणे सहज शक्य झाले आहे. इतर राज्यातून ये-जा करणाऱ्या तसेच जिल्ह्यातून इतर राज्यात जाणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र कमी वेळात जास्त अंतर कापण्याच्या नादात वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. बहुतांश चालक नियमांचे पालन करत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या चालकांना जीव गमवावा लागत आहे. याशिवाय याचा इतरांनाही धोका होत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या 11 महिन्यांच्या काळात लहान-मोठे मिळून 388 अपघात झाले आहेत.
यात तब्बल 222 जणांना जीव गमवावा लागला असून, 308 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बहुतांश अपघात हे मोटार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानेच होत आहेत. नियम पाळले जात नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्याची जनजागृती आणखी प्रभावी करणे आवश्यक बनले आहे.
जिल्ह्यात 11 महिन्यांत 202 घातक अपघात झाले. यात तब्बल 222 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 205 पुरुषांचा तर 17 महिलांचा समावेश आहे. रस्ते गुळगुळीत झाले तरी अनेक चालक वेळेची बचत व्हावी, म्हणून राँग साईडने वाहन चालवत आहेत. मात्र बेशिस्त वाहनचालकांचा शॉर्टकट इतरांच्या जीवावर बेतत आहे.