

MLA Bangar celebrate Diwali with needy children
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शनिवारी दिवाळी गरजू मुलांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी मुलांशी तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी हजारो मुलांना कपड्यांचे वाटप केले. नवीन ड्रेस पाहताच मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
दिवाळीचा मोठा सण प्रत्येक कुटुंब उत्साहाने साजरा करतो. आकाशदिवे, गोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. मात्र हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांसाठी दररोजच सण, उत्सव असतात. दिवसभर काम केल्यानंतर मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पोटात अन्न पडले हाच त्यांचासाठी आनंदाचा सण असतो.
दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी गरजू कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबाच्या तसेच त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्यासाठी शनिवारी सकाळीच परिसरातील गरजू कुटुंब व मुलांना सोबत घेत दिवाळी पहाट साजरी केली. यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. कुठलीही परिस्थिती असली तरी शिक्षण सोडू नका, शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो हे लक्षात ठेवा. शिक्षणात काही अडचण असेल तर आपण त्या दूर करणार आहे.
तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे आश्वासन त्यांनी मुलांसह त्यांच्या कुटुंबियांना दिले. यावेळी हजारो मुलांना नवीन ड्रेसचे वाटप केले. यावेळी नवीन ड्रेस मिळताच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. या उपक्रमातून आमदार बांगर यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. यावेळी माजी नगरसेवक श्रीराम बांगर, सुभाष बांगर, गणेश बांगर, संतोष वेरुळकर, मंगेश दराडे, संदीप बांगर, राहुल घुगे, राहुल बांगर, चेतन नागरे आदी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.