

Mahavitaran bill issue
जवळाबाजार: देशभरात घरोघरी सोलर पॅनल्स बसवले जात आहेत. सोलर ग्राहकांनी तयार केलेली अतिरिक्त वीज महावितरणकडे जमा होते, आणि ग्राहकांनी जास्त वीज वापरल्यास जमा युनिटमधून वीज बिल कमी केले जाते. मात्र, औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयाने जवळाबाजार येथील एका सोलर ग्राहकाला जवळपास १३०० युनिट वीज जमा असतानाही तब्बल २ लाख २६ हजार ५९० रुपयांचे चार महिन्यांचे वीज बिल पाठवले आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारातील गोंधळ समोर आला आहे.
जवळाबाजार येथील अनिल प्रभाकर पोरवाल यांनी जानेवारी महिन्यात सोलर पॅनल बसवले. चार महिन्यांत त्यांनी सोलरमधून २०८२ युनिट वीज तयार केली, त्यातील ६१४ युनिट वीज स्वतः वापरली, तर उर्वरित वीज महावितरणकडे जमा झाली. मागील चार महिन्यांपासून महावितरणकडून दर महिन्याला रीडिंग घेतली जात होती, मात्र वीज बिल दिले जात नव्हते. वारंवार चौकशी करूनही "लवकरच बिल मिळेल" असे उत्तर मिळत होते.
अचानक १९ जुलैरोजी रात्री ९.४५ वाजता महावितरणकडून २ लाख २१ हजार ७०० रुपयांचे बिल २८ जुलैपर्यंत भरण्याचा मेसेज आला. रात्रीच्या वेळी एवढे मोठे बिल पाठवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर महावितरणने दुसरे बिल तयार केले, मात्र त्यातही सोलर युनिट्सची माहिती नव्हती. पहिल्या बिलात ६१४ युनिट वापरासाठी २ लाख २६ हजार ५९० रुपये आकारले, तर दुसऱ्या बिलात १५९० रुपये आकारले.
सध्या औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयात सोलर बिलाची मागणी करण्यात आली असून, आता तिसरे बिल कसे आणि किती लाखांचे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोलर ग्राहकांनी तयार केलेली न वापरलेली वीज महावितरणकडे जमा होत असते. जास्त वीज वापरल्यास ग्राहकाला बिल दिले जाते. मात्र, सध्या महावितरणकडून केवळ सर्विस चार्जचे किरकोळ बिल दिले जात होते. आता तिसरे बिल कोणते आणि किती लाखांचे येणार, याची प्रतीक्षा आहे.