

Turmeric Cultivation in Hingoli District
वसमत : मराठवाड्यात हळद उत्पादकांचा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आता राज्यभरात होऊ लागली आहे. यंदा जवळपास हळद लागवडीचे ३० टक्के क्षेत्र वाढणार असून 40 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणार आहे. हळद संशोधन केंद्राच्या पुढाकारातून शेतकर्यांना मार्गदर्शन मिळत आहे. तसेच अडीच लाख हळदीची रोपे देखील उपलब्ध झाली आहेत.
जिल्ह्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत येथे आकार घेत आहे. याकामी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, सहाजिकच 15 ते 20 टक्क्यांनी दरवर्षीला हळद लागवडीतील होणारी वाढ ही हिंगोली जिल्ह्याला हळद उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख करण्याच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील हळदीला जागतिक स्तरावर भौगोलिक नामांकन प्राप्त होत वसमत हळदीने संबोधले जात आहे.
जिल्ह्यातील 3 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 2 लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीन, तूर, हळद कापूस यासह इतरही पिकांची लागवड करण्यात आली. मात्र, मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षीला 2000 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पेर्यामध्ये घट होत, या जमिनीवर शेतकरी हळद लागवडीचे नियोजन करीत आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास 40 ते 45 हजार हेक्टरवर हळद लागवड होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून केलेल्या विविध स्तरावरील प्रयत्नातून हळद उत्पादक शेतकर्यांना हळदीला चांगले दर मिळत आहेत. या दरातील स्थिरता पाहता, आगामी काळात यापेक्षाही हळदीला चांगला दर मिळेल असा विश्वास असल्याने शेतकरी हळद लागवडीकडे स्वतःहून वळत आहे. मागील वर्षी हिंगोली जिल्ह्यात 36000 हे. क्षेत्रावर हळदीची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र 40 हजार हेक्टरवर जवळपास असणार आहे. मराठवाडा विभागात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र वसमत येथील केंद्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच हळदीचे विविध वाणांचे शुद्ध व दर्जेदार बेणे खरीप 2024 मध्ये 380 क्विंटल बेणे उत्पादित केले. त्यातील 200 क्विंटल पेक्षा अधिक बेणे शेतकर्यांना दिले. तसेच 45 हजार दर्जेदार रोपेही उपलब्ध करून देत शेतकर्यांनी लागवड केली होती. या बेण्याची लागवड करून इतर शेतकर्यांना खरीप 2025 मध्ये जवळपास 1200 क्विंटल बेणे व प्रोटेड पद्धतीने जवळपास 2.50 लाख रोपांची लागवड करून, ना नफा ना तोटा या माफक दरामध्ये शेतकर्यांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शेतकर्यांना ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण, चर्चासत्र व वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच हळदीचे नवीन संकरित वाण, खत व पाण्याचे योग्य नियोजन, कृषी अवजारे व यांत्रिकीकरण, बॉयलर, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, हळद काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य, माती व पाणी तपासणी केंद्र यासह इतरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी हळद संशोधन केंद्राच्या संपर्कात राहून शेतकर्यांनी हळदीचे उत्पन्न वाढवावे. त्याचबरोबर हळद संशोधन व प्रक्रिया उद्योग उभारणीच्या माध्यमातून सुवर्णक्रांतीकडे वाटचाल करावी. जेणेकरून या संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकर्याचे जीवनमान उंचविण्यास निश्चितच मदत होणार आहे.