

कोल्हापूर : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्या आणि वर्षापासून हिंगोली, धाराशिव पोलिसांना चकवा देत फरार राहिलेल्या कुख्यात आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. आंतरराज्य टोळीचे गडमुडशिंगी व शिरोली एमआयडीसी येथील कनेक्शन उघडकीस आले आहे. म्होरक्यासह बाल संशयित अशा तिघांना पथकाने जेरबंद करून 5 लाखांच्या 8 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
म्होरक्या सनी महावीर गायकवाड (20, रा. भीमनगर, धाराशिव), गोविंद महादेव सायगुंडे (30, संत कबीरनगर, वांगीरोड, परभणी, सध्या रा. व्यंकटेश्वरा पार्क, गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्यासह शिरोली एमआयडीसी येथील चौदा वर्षीय बालसंशयिताचा अटक केलेल्यात समावेश आहे. शिरोली येथील बालसंशयिताचा कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या बहुतांश गुन्ह्यात सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. टोळीचा म्होरक्या गोविंद सायगुंडे हा सात-आठ महिन्यांपासून गडमुडशिंगी येथे भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहितीही चौकशीतून पुढे आली आहे.