

आखाडा बाळापूर ः कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका शालेय बसने पायी चालणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त तब्बल 55 विद्यार्थी कोंबून भरले होते. शाळा व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे.
वारंगा फाटा येथील साई इंग्लिश स्कुललची बस क्र. एम.एच.02 एक्सए 1482 शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दांडेगाव, डिग्रस, रामेश्वर आणि तोंडापूर या मार्गावरील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. तोंडापूर रस्त्याजवळ समोरून पायी चालत येणारे रामराव गोपाळराव कपाळे वय 65 वर्ष रा. गोरलेगाव जि. नांदेड यांना बसने जोराची धडक दिली.
बसचे टायर कपाळे यांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. अपघात घडताच बसमधील विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी रडण्यास सुरूवात केली. अपघातस्थळी जमलेल्या नागरीकांनी धाव घेत रडणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर देत पालकांशी संपर्क केला. मात्र शाळा व्यवस्थापनाचा असंवेदनशीलपणा उघड झाला.
घटनास्थळापासून शाळा हाकेच्या अंतरावर असूनही शाळा व्यवस्थापनाने तातडीने दुसरी बस पाठविली नाही. जवळपास एक तास अपघातग्रस्त बसमध्ये विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत रडत होते. त्यानंतर दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच वारंगा मदत केंद्राचे जमादार शेख गौसिद्दीन आणि पोलीस शिपाई प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. मात्र शाळेच्या बेजबाबदार कारभारावर आता कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.