Hingoli accident | शालेय बसच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; ५५ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

वारंगा फाट्यावरील धक्कादायक घटना
Hingoli accident
Hingoli accident
Published on
Updated on

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास एका शालेय बसने पायी चालणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या बसने हा अपघात केला, त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ५५ विद्यार्थी कोंबून भरलेले होते. शाळा व्यवस्थापनाच्या या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे.

वारंगा फाटा येथील 'साई इंग्लिश स्कूल'ची बस (क्र. MH 02 XA 1482) शनिवारी दुपारी १२:३० वाजता दांडेगाव, डिग्रस, रामेश्वर आणि तोंडापूर या मार्गावरील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. तोंडापूर रस्त्याजवळ समोरून पायी चालत येणारे रामराव गोपाळराव कपाळे (वय ६५, रा. गोरलेगाव, जि. नांदेड) यांना बसने जोराची धडक दिली. बसचे टायर कपाळे यांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विद्यार्थ्यांचा टाहो आणि शाळेची अनास्था

अपघात घडताच बसमधील विद्यार्थी प्रचंड घाबरले आणि त्यांनी रडण्यास सुरुवात केली. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी धाव घेत रडणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर दिला आणि पालकांशी संपर्क करून दिला. मात्र, शाळा व्यवस्थापनाचा असंवेदनशीलपणा येथे उघड झाला. घटनास्थळापासून शाळा हाकेच्या अंतरावर असूनही, व्यवस्थापनाने तातडीने दुसरी बस पाठवली नाही. जवळपास एक तास विद्यार्थी अपघातग्रस्त बसमध्येच घाबरलेल्या अवस्थेत रडत होते. त्यानंतर दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली.

नियमांची पायमल्ली; मुलांच्या जीवाशी खेळ?

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बसची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या:

  • ओव्हरलोडिंग: बसची क्षमता नसतानाही ५० ते ५५ विद्यार्थी त्यात कोंबले होते.

  • सुविधांचा अभाव: बसमध्ये प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नव्हती. उपस्थित नागरिकांनीच मुलांना पाणी दिले.

  • चालकाची मनमानी: चालक आणि वाहकाकडे युनिफॉर्म, सीट बेल्ट किंवा ओळखपत्र नव्हते.

  • कागदपत्रांचा अभाव: वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे नसल्याची चर्चा घटनास्थळी होती.

पोलिसांची कारवाई

अपघाताची माहिती मिळताच वारंगा मदत केंद्राचे जमादार शेख गौसिद्दिन आणि पोलीस शिपाई प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही, मात्र शाळांच्या अशा बेजबाबदार कारभारावर आता कठोर कारवाईची मागणी पालकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news