

Instructions to licensees to deposit weapons
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर २२५ परवानाधारकांचे शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत २६ जणांना सूचना देऊन त्यांना तातडीने शस्त्र जमा करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिल्या आहेत.
हिंगोली, वसमत व कळमनुरी नगर पालिकांच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीत माघारी नंतर नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता राजकिय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही त्यांच्या समर्थकांना सोबत घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे.
शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढला जात असून जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक शरद मरे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून त्यानुसार ठिकठिकाणी बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तर अधिकाऱ्यांनाही काही प्रभागांची जवाबदारी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून परवानाधारकांना त्यांच्याजवळील शस्त्र नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील २४२ पैकी २२५ जणांनी त्यांच्या जवळील शस्त्र पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.
हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ५५ जणांनी शस्त्र जमा केली असून कळमनुरी ६, बासंबा १२, हिंगोली ग्रामीण ८, औंढा नागनाथ ११, सेनगाव २३, गोरेगाव १३, नर्सी नामदेव ३, वसमत शहर २२, हट्टा ३, कुरुंदा ११, आखाडा बाळापूर ५५, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात ३ शस्त्र जमा झाले आहेत. उर्वरीत २६ जणांना तातडीने शस्त्र त्यांच्या नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.