

Disabled beneficiaries will get only Rs. 1.500 instead of Rs. 2.500
भूम, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या वाढीव रकमेचा लाभमिळत नसल्याची तक्रार केली आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह १,५०० च्या ऐवजी २,५०० अनुदान देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्यापही अनेकांना जुन्या दरानुसार केवळ १,५०० इतकेच अनुदान मिळत असल्याने नाराजी व्यक्त झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांनी एकत्र येत निवेदन सादर केले. वाढीव अनुदान लागू करण्यात विलंब का होत आहे याचा तपास करून शासन निर्णयानुसार प्रतिमाह २,५०० प्रमाणे रक्कम तत्काळ वितरित करावी, तसेच वाढ लागू झालेल्या महिन्यांपासूनची उर्वरित थकबाकीही जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासोबत समन्वय साधून प्रमाणित दिव्यांग लाभार्थ्यांची यादी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि डीबीटी () द्वारे निधी वितरणाचा अहवाल तपासून निर्णय प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदन मोहिमेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना सहभागी झाली. संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, संस्थापक सचिव रियाज पठाण, तसेच तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्षा यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. वाढीव अनुदान मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाने मानवी दृष्टिकोनातून त्वरित वाढीची अंमलबजावणी करावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.