

In Aundha Nagnath, thieves broke 11 shops
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
औंढा नागनाथ येथील मुख्य बाजारपेठेतील तब्बल 11 दुकाने चोरट्यांनी एका रात्रीच फोडल्याची घटना (शनिवार) सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये काही मोबाईल शॉपी, आपले सरकार सेवा केंद्र तर इतर दुकानांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
औढा नागनाथ येथील मुख्य बाजारपेठेत शहराच्या कमानीजवळच गोबाडे व्यापारी संकुल व त्याच्या समोरच्याच बाजूला ठाकूर व्यापारी संकुल आहे. या ठिकाणी मोबाईल शॉपी, झेरॉक्स सेंटर, आईस्क्रीम पार्लर तसेच तीन आपले सरकार सेवा केंद्र आहेत. संबंधित दुकानांचे मालक शुक्रवारी रात्री दुकाने बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बाजारपेठेत येऊन चांगलाच धुमाकुळ घातला.
चोरट्यांनी काही दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. काही दुकानांचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर दुकानातील ऐवज घेऊन पोबारा केला.
दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना दुकानांचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यांनी तातडीने दुकान मालकांना सांगितले. या घटनेची माहिती शहरात कळताच नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एक दोन नव्हे तर तब्बल 11 दुकाने फोडलेली दिसून आली.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार ज्ञानेश्वर गोरे, माधव सुर्यवंशी, संतोष धनवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या पोलिस या भागात पाहणी करीत असून परिसरातील दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुजेटवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेमध्ये नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी चार दुकाने फोडली होती. मात्र त्याची तक्रार देण्यात आली नाही. मात्र आता तब्बल 11 दुकाने फोडल्यामुळे व्यापाऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.