

Mother-Daughter Drown in Well
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथे एका महिलेने अडीच वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथे ज्ञानेश्वर उर्फ भाऊराव मुकाडे यांचा त्यांची पत्नी सीमा भाऊराव मुकाडे वय 25 वर्ष यांच्यासोबत शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादामध्ये ज्ञानेश्वर यांनी सीमा यांच्यावर आरोप करून त्यांचा मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे.
या प्रकरणानंतर सीमा यांनी त्यांची अडीच वर्षाची मुलगी आरती हिला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून जीवन संपवले. या प्रकरणी माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जि.एस.राहिरे. उपनिरीक्षक शेख खुदुस यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोघींवर जामगव्हाण येथे रविवारी दिनांक 27 एप्रिल रोजी एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
या प्रकरणात संगीता तातेराव रिठ्ठे यांनी सोमवारी दिनांक 28 एप्रिल रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये मृत सीमाचा पती भाऊराव मुकाडे व सासरा दिगंबर मुकाडे यांच्या विरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो.नी. गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.