

Husband and wife beaten up, case registered against eight people at Narsi police station
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे धुरा फोडण्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण करून जखमी करणाऱ्या आठ जणांवर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे एकनाथ शिंदे व सारंगधर शिंदे यांचे शेताला लागूनच शेत आहे. त्यांच्या धुऱ्याच्या कारणावरून नेहमीच कुरबुरी होऊ लागल्या होत्या. त्यातून वादाला तोंड फुटले होते. शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे हे त्यांच्या मित्रासोबत घरासमोर बोलत उभे होते. यावेळी सारंगधर तेथे आला. तु सदर व्यक्तीला का बोलत आहे व यापुर्वी धुरा का फोडला या कारणावरून वाद सुरु केला. शाब्दिक चकमकी नंतर वाद वाढत गेला.
यावेळी तेथे आलेल्या आठ जणांनी एकनाथ यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यामध्ये लोखंडी पाइपने मारहाण झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केल्यानंतर त्यांची पत्नी मध्ये पडल्या असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी एकनाथ यांनी शनिवारी पहाटे नर्सी नामदेव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी सारंगधर शिंदे, हनुमान शिंदे, दामोदर शिंदे, काशीराम शिंदे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, जमादार व्ही. बी. कुटे, जी. बी. राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून जखमी झालेल्या एकनाथ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जमादार कुटे पुढील तपास करीत आहेत.